७. वार्षिक उत्पन्न व व्यवहार्यता विश्लेषण


या विभागात प्रकल्पातून येणारे वार्षिक उत्पन्न, प्रकल्पाचे उत्पादन सुरू झाल्यानंतर पुढील पाच वर्षांचा नफा तोटा अंदाज (Profit & Loss Statement), आर्थिक उलाढाल (Cash Flow Statement) व आर्थिक ताळेबंद (Balance Sheet) याबाबत सविस्तर विवेचन केले जाते. केलेल्या अंदाजवरून प्रकल्पाची व्यवहार्यता मापली जाते. आर्थिक विवेचनाच्या व्याख्या व त्यांचा गर्भार्थ या भागात समजावून घेऊ. 

उत्पन्न (Income)

प्रकल्प सुरू झाल्यानंतर होणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज सर्वप्रथम मांडणे आवश्यक आहे. प्रकल्पाच्या उत्पादनाची निर्धारित क्षमता (Rated Capacity) व उत्पादनास मिळणारा बाजारभाव यावरून प्रकल्पाच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज तयार केला जातो. प्रकल्प पहिल्या दिवशीपासून निर्धारित क्षमतेत चालेल हे अपेक्षित नाही. तांत्रिक व आर्थिक अडचणी, बाजारपेठेचा कल, ग्राहकाची स्वीकृती आशा अनेक अडचणींना प्रकल्पाला सुरुवातीच्या काळात सामोरे जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून उत्पादनाचा चढता क्रम (Scaling up) अनुमानीत केला जातो व त्याप्रमाणे पुढील पाच वर्षाचा उत्पन्नाचा अंदाज मांडला जातो.

नफा तोटा अंदाज (Profit & Loss Statement)

मागील भागात विवेचनाच्या आधारे प्रकल्पाचा पाच वर्षांचा नफा तोटा अंदाज मांडला जातो. यात वार्षिक उत्पन्न, उत्पादन खर्च, दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याजाची तरतूद (Interest on long term loan) , खेळत्या भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची तरतूद (Interest on short term loan), घसारा (Depreciation) यांचा समावेश होतो. उत्पन्नातून वरिल खर्च वजा करून राहणारा निव्वळ नफा, अपेक्षित उत्पन्नावरील कर व करमुक्त नफा यांचा पाच वर्षांचा अंदाज मांडला जातो.

आर्थिक उलाढाल (Cash Flow Statement)

नफा तोटा अंदाजात नमूद केलेल्या खर्चाशिवाय असणारी देणी व त्याची परतफेड करण्याची प्रकल्पाची क्षमता पडताळण्यासाठी आवक जावक रकमेच्या वार्षिक उलढालीचा अंदाज मांडला जातो (Cash flow Statement). खेळत्या भांडवलात होणारी वाढ (Increase in Working Capital), दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड (Repayment of long term loan), भांडवली खर्चात वाढ (Normal Capital Expenditure), लाभांशाचे वितरण (Dividend Distribution) इत्यादी रकमेचा येथे अंदाज मांडला जातो. या सर्व तरतुदींसाठी पुरेशी रक्कम प्रकल्पाकडे असल्याचा पडताळा केला जातो.

आर्थिक ताळेबंद (Balance Sheet)

प्रकल्पाची मालमत्ता (Assets) आणि देणी (Liabilities) यांचा ताळेबंद केला जातो. प्रकल्पाच्या मालमत्तेत प्रकल्पाची स्थावर मालमत्ता (Fixed Assets), खेळती मालमत्ता (Current Assets), बँकेत असलेली रक्कम (Cash in Hand) इत्यादींचा समावेश होतो. याउलट प्रकल्पाच्या देणेकऱ्यांमध्ये भागधारकांचा वाटा (Reserves & Surplus), बँकेची देणी (Term Loans), इत्यादींचा समावेश होतो. प्रकल्पाची आर्थिक परिस्थिती आर्थिक ताळेबंदावरून समजून घेता येते.

प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळण्याचे काही महत्त्वाचे निकष आहेत. त्यापैकी काही निकष येथे समजावून घेऊ. 

ब्रेक इव्हन अनॅलीसिस (BEP) हा यापैकी एक महत्वाचा निकष आहे. प्रकल्पाचा अप्रत्यक्ष खर्च वसूल होण्यासाठी प्रकल्पातून कमीतकमी किती उत्पादन होणे आवश्यक आहे याला BEP असे संबोधले जाते. प्रकल्प तोट्यात केंव्हा जाईल याचा अंदाज याद्वारे बांधता येतो. 

पे बॅक ( Pay Back ) कालखंडाची गणना हा देखील प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा एक निकष आहे. प्रकल्पात लावलेले भांडवल किती वर्षात वसूल होईल याची मोजणी Pay Back द्वारे पडताळता येते. 

इंटर्नल रेट ऑफ रिटर्न ( IRR ) हा देखील प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा महत्वाचा निकष आहे. प्रकल्पात लावलेले भांडवल किती टक्क्याने वाढत आहे याचे मोजमाप IRR मोजणीत करता येते. बाजारात भांडवलावर मिळणाऱ्या व्याजाशी याची तुलना करून प्रकल्पाची व्यवहार्यता निश्चित करता येते.