३. प्रक्रिया, तंत्रज्ञान व यंत्रसामग्री 


प्रकल्पाच्या नियोजनाची पुढची पायरी योग्य तंत्रज्ञान व यंत्र सामग्री यांची निवड ही होय. तंत्रज्ञानाची निवड करताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ कच्चा माल व इतर निविष्ठा, रूपांतरण दर, उत्पादनाची प्रत, यांत्रिकरण, विश्वासार्यता, भविष्यात उत्पादनात वाढ करण्याची शक्यता, इत्यादी. 

तंत्रज्ञान व निवडीचे निकष (Selection of Technology)

कच्च्या मालाची उपलब्धता  :  उत्पादनास लागणारे तंत्रज्ञान निवडतेवेळी उत्पादनास लागणारा कच्चा माल स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहे वा नाही हे बघणे आवश्यक आहे. किंबहुना उत्पादनासाठी स्थानिक कच्चा माल वापरता येईल असे तंत्रज्ञान अंगीकारणे आवश्यक आहे. यामुळे कच्चा माल खरेदी सोपी होते, कच्च्या मालाची साठवणूक कमी होते व उत्पादनाच्या खर्चात बचत होते. उदाहरणार्थ बटाट्याचे वेफर्स बनवण्याच्या प्रकल्पात ऑलिव्ह तेल वापरण्याचे तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा खोबऱ्याचे तेल वापरण्याचे तंत्रज्ञान अवलंबणे योग्य आहे कारण भारतात खोबऱ्याच्या तेलाची उपलब्धता ऑलिव्ह तेला पेक्षा जास्त आहे व ते बरेच स्वस्तही आहे. 

रूपांतरण दर (Conversion Cost) : तंत्रज्ञानाची निवड करताना उत्पादनात किती कच्चा माल लागतो हे समजावून घेणे आवश्यक आहे. रूपांतरण दर, म्हणजे  विकाऊ माल / कच्चा माल याची टक्केवारी जास्त असलेले तंत्रज्ञान निवडणे योग्य असते. याने कच्च्या मालाची बचत होऊन उत्पादन खर्चात बचत होते. 

उत्पादनाची प्रत (Quality of Produce) : बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनाची प्रत निवडलेल्या तंत्रज्ञानाद्वारे तयार करता येते अथवा नाही याचा पडताळा करणे आवश्यक आहे. 

यांत्रिकीकरण (Automation) : निवडलेल्या तंत्रज्ञानांत यांत्रिकीकरणाचा कितपत उपयोग केला आहे हे पाहणे आवश्यक आहे. यांत्रिकीकरणाने मोठ्या प्रमाणावर माल तयार करता येतो, मालाची प्रत सुधारते, मनुष्यबळात बचत होते व उत्पादन खर्च कमी होतो. परंतु प्रकल्प छोट्या प्रमाणावर उत्पादन करणार असेल अथवा स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध असेल तर जरुरीपेक्षा जास्त यांत्रिकीकरणाने प्रकल्पाचा खर्च नाहक वाढतो. उदाहरणार्थ ५ ते १० गायिंचा दुग्धव्यवसाय असेल तर हाताने दूध काढणे योग्य आहे. तेच जर प्रकल्प ४० ते ५० गायिंचा असेल तर दूध काढण्याचे मशीन ठेवणे नक्कीच परवडेल व सोईचे असेल. 

विश्वासार्ह्यता (Reliability) : तंत्रज्ञान अंगिकारताना ते तंत्रज्ञान यापूर्वी वापरले आहे का व त्यातून येणारे उत्पादन बाजारात विकले जाते का हे पडताळणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाने चालणाऱ्या यंत्रसामग्रीमध्ये वारंवार दुरुस्ती लागते का व लागणारे सुटे भाग सहज उपलब्ध आहेत का हे पाहणेही जरुरीचे असते. विक्रेत्याची सेवा सहज उपलब्ध असणेही आवश्यक आहे. याच बरोबर या तंत्रज्ञानाने सुरु केलेला प्रकल्प भविष्यात मोठा करता यावा. 

प्रक्रिया व यंत्रसामग्री (Plant & Machinery)

निवडलेल्या तंत्रज्ञाच्या आधारे कच्चा माल ते विकाऊ उत्पादन यातील प्रक्रियेचे सविस्तर विवेचन या भागात केले जाते. उत्पादनास लागणाऱ्या कच्च्या मालाची प्रत व प्रक्रियेची टप्प्या टप्प्याने माहिती दिली जाते. प्रक्रिया करत असताना लागणारी मालाची हाताळणी, प्रक्रियेस लागणारे तापमान, आर्द्रता, वातावरण याबद्दलचे विवेचन या भागात केले जाते. कच्चा माल व इतर निविष्ठा यांचे प्रमाण, प्रक्रियेत येणारी घट, पॅकिंग व साठवणुकीची आवश्यकता यावर सविस्तर विवेचन या भागात केले जाते. प्रक्रियेस लागणारी यंत्र सामुग्री यावर सविस्तर विवेचन केले जाते. लागणारी प्रमुख यंत्र सामुग्री, घटक यंत्रांची सविस्तर यादी, यंत्राना लागणारे सुटे भाग, कारखान्यास लागणाऱ्या इमारती व बांधकाम, यंत्र सामुग्री चालवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर विवेचन केले जाते. प्रकल्पात लागणाऱ्या इतर सामग्रीची माहिती या भागात दिली जाते. उदाहरणार्थ वजन काटा, ट्रॉली, क्रेन, इत्यादी माल हाताळण्याची साधने, प्रयोग शाळा, कार्य शाळा तसेच प्रक्रियेस लागणारी वीज, पाणी, दाब वायू, वंगण, इत्यादी साठी लागणारी यंत्र इत्यादी.. 

प्रकल्प सुरु झाल्यावर प्रकल्पाचे व्यवस्थापन कसे केले जाईल याची माहिती देणे आवश्यक आहे.