१. परिचय 

परिचय 

कोणत्याही प्रकल्पाची सुरुवात करण्याअगोदर प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करणे आवश्यक असते. प्रकल्प तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य आहे अथवा नाही याचा पडताळा या अहवालात घेतला जातो. प्रकल्पाच्या जमेच्या व धोक्याच्या अनेक बाबींचे अहवालात विश्लेषण केले जाते. अहवालाच्या निर्ष्कर्षावरून या प्रकल्पात पुढे जावे अथवा नाही याविषयीचे निर्णय प्रवर्तक घेतो. तसेच प्रकल्पासाठी भागभांडवल उभे करणे व बँकेकडून कर्ज मंजुरी मिळवणे या साठीही अहवाल महत्वाचा ठरतो. सरकारी परवाने, अनुदान इत्यादी मिळवण्यासाठीदेखील अहवालाची आवश्यकता असते. व्यवहार्यता अहवाल बनवणे व तो समजावून घेणे ही कोणत्याही उद्योजकाची गरज आहे.  

व्यवहार्यता अहवालात प्रकल्पाच्या  पुढील महत्त्वाच्या बाजूंचा विचार  केला जातो : १. प्रकल्पाची संकल्पना व प्रवर्तकाची प्रकल्प  उभारण्याची क्षमता, २. बाजारपेठ, कच्या मालाची उपलब्धता व त्याप्रमाणे उत्पादन क्षमता ठरवणे, ३. प्रकल्पाला लागणारे तंत्रज्ञान व यंत्र सामग्री, ४. प्रकल्प उभारणीचे वेळापत्रक, ५. मनुष्यबळ व उत्पादन खर्च, ६. प्रकल्प उभा करण्यास लागणारा खर्च, व ७. प्रकल्पातून येणारे उत्पन्न व आर्थिक व्यवहार्यता विवेचन. पुढील भागात व्यवहार्यता अहवालातील सर्व मुद्दे सविस्तर समजावून घेऊ. हे पुस्तक शेती माल प्रक्रिया व शेतीस संलग्न असे लघु उद्योग समोर ठेऊन तयार केला आहे. विषय वर नमूद केलेल्या सात भागात विभागाला आहे. 

संकल्पना 

सद्य प्रकल्प सुरु करण्याची व तो यशस्वी होण्याची प्रमुख करणे कोणती यावर विवेचन या विभागात केले जाते. नावीन्यपूर्ण उत्पादन, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग, प्रवर्तकाचा अनुभव, बाजारपेठेत सहज शिरकाव करण्याची क्षमता, कच्चा माल मुबलक मिळण्याची शक्यता, प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्याची शक्यता, उत्पादनाचा खर्च प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी असण्याची शक्यता, अशा अनेक कारणाने प्रकल्प यशस्वी होऊ शकतो. यापैकी कोणते कारण सद्य प्रकल्पाला लागू होते हे नमूद करणे या भागात अपेक्षित आहे. याच बरोबर प्रकल्पाबद्दल संक्षिप्त माहिती देणे अपेक्षित आहे, जेणे करून वाचकाला प्रकल्पाचा साधारण अंदाज यावा. 

संस्थेच्या प्रकाराची निवड 

व्यवसायाचा प्रकार, व्यवसायात येणारे संभाव्य धोके, व्यवसाय वाढविण्याबाबत प्रवर्तकाच्या योजना व आराखडा यासर्वांचा विचार करून संस्थेच्या प्रकाराची निवड केली जाते. लहान किंवा मध्यम आकाराचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खालील तीन प्रकार निवडले जातात.

१. वैयक्तिक व्यवसाय  ( Proprietorship )

२. भागीदारी व्यवसाय ( Partnership )

३. खाजगी मर्यादित कंपनी ( Private Limited Company )

वैयक्तिक व्यवसाय ( Proprietorship ) : वैयक्तिक व्यवसाय एका व्यक्तीच्याच संपूर्ण मालकीचा असतो. या पद्धतीत मिळालेला फायदा किंवा तोटा, व्यक्तीच्या मिळकतीत जमा करून आयकर भरला जातो. परंतु या प्रकारात व्यवसायात नुकसान भरपाईस मर्यादा नसते. व्यक्तीची सर्व मालमत्ता वेठीस लागते. घेतलेल्या कर्जास व्यक्तिगत मालमत्ता तारण ठेवली जाते. या प्रकाराने व्यवसाय सुरु करणे अतिषय सोपे असले, तरी व्यवहारात येणारे संभाव्य धोके पाहून याप्रकारच्या संस्थेची निवड करावी. 

व्यावसायिक सेवा देणाऱ्या संस्था किंवा ज्या व्यवसायात धोके अतिशय कमी प्रमाणात असतात अशा व्यवसायात वैयक्तिक व्यवसायाची निवड केली जाते. उदाहरणार्थ डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील यासारखे व्यावसायिक किंवा सल्लागार अथवा कमिशन एजंट यासारखे व्यावसायिक वैयक्तिक व्यवसाय पद्धतीची निवड करतात. परंतु ज्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक केली जाते व संभाव्य धोक्याचे प्रमाण जास्त असते अशा व्यवसायात वैयक्तिक व्यवसाय निवडला जात नाही. उदाहरणार्थ उत्पादन, बांधकाम, इत्यादी व्यवसायातील कंपन्या किंवा मालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री करणाऱ्या कंपन्या वैयक्तिक व्यवसाय निवडत नाहीत. 

भागिदारी व्यवसाय ( Partnership ) : दोन किंवा जास्त व्यक्ती एकत्र येऊन स्थापलेल्या व्यवसायाला ‘भागिदारी व्यवसाय’ म्हणतात. भारतीय कॉर्पोरेट अधिनियमानुसार भागीदारी व्यवसाय मर्यादित लायबिलिटी प्रकारात स्थापन करता येतो. ‘लिमिटेड पार्टनरशिप’ अधिनियमानुसार, हा भागीदारी व्यवसाय ‘मर्यादित जबाबदारीस’ ( Limited Liability ) पात्र होतो. या प्रकाराला Limited Liability Partnership ( LLP ) असे संबोधले जाते. या प्रकारात व्यवसायाला, वेगळे कायदेशीर अस्तित्व असते व व्यवसायाचे वेगळे ‘नफा-तोटा’ व ‘ताळेबंद’ विधान असते. व्यवसायाचे कर्ज, मालमत्ता इत्यादी भागीदारांच्या वैयक्तिक मालमत्तेशी निगडित नसते. व्यवसायात येणारे संभाव्य धोके वैयक्तिक मालमत्तेशी निगडित नसतात.  आर्थिक जबाबदारी, व्यवसायातील गुंतवणुकीपुरतीच असते. ‘भागीदारी व्यवसायाची’ सुरुवात वैयक्तिक व्यवसायाप्रमाणेच केली जाते, परंतु त्यात ‘भागीदारी कराराची’ भर पडते. भागीदारी कराराची रीतसर नोंदणी केली जाते. LLP संस्थेची नोंदणी, ‘कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या’ संकेतस्थळावर करता येते. 

खाजगी मर्यादित कंपनी ( Private Limited Company ) : दोन किंवा अधिक भागधारक एकत्र येऊन खाजगी मर्यादित कंपनी स्थापन करता येते. भागदारकांची आर्थिक जबाबदारी कंपनीच्या भांडवलातील त्यांच्या शेअर च्या प्रमाणात असते. सर्व भागदारकांची एकत्रित जबाबदारी, कंपनीच्या भांडवलाएवढीच मर्यादित असते. सर्व भागधारक, संचालक मंडळाची निवड करतात. कंपनीच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी संचालक मंडळाची असते. कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियमानुसार’ केली जाते. कंपनीच्या  ‘मेमोरँडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’ची नोंदणी केली जाते. कंपनीचे व्यवहार यास अनुसरून केले जातात. ‘खाजगी मर्यादित कंपनीची’ नोंदणी देखील ‘कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या’ संकेतस्थळावर केली जाते. 

याशिवाय व्यवसायाचे अनेक प्रकार असतात. सद्य विवेचन, निर्यात लघु उद्योगाच्या अनुषंगाने केले असल्याने वरील प्रकारात सीमित केले आहे. वरील विवेचनावरून दिसेल की लघु उद्योगास ‘लिमिटेड लिएबिलिटी पार्टनरशिप’ ( LLP ) किंवा ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ हे पर्याय योग्य ठरतात. या दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करून व्यवसाय सुरु करता येतो. 

प्रवर्तकाबद्दल माहिती 

प्रकल्प यशस्वी होण्यात प्रवर्तकाचा मोठा वाटा असतो. या उद्देशाने प्रवर्तकाची सविस्तर माहिती या भागात देणे अपेक्षित आहे. प्रवर्तकाचे नाव, पत्ता, शिक्षण, तसेच त्याचा उद्योग व्यवसायात पूर्वानुभव, प्रकल्पाला लागणाऱ्या भागभांडवलाचे नियोजन करण्याची प्रवर्तकाची आर्थिक क्षमता, इत्यादी गोष्टी या भागात नमूद करणे आवश्यक आहे. प्रकल्पाला लागणाऱ्या कर्ज मंजुरीसाठी ही माहिती आवश्यक असते. बऱ्याचदा प्रकल्पाला लागणारा कच्चा माल प्रवर्तक बनवत असतो. अशा परिस्थितीत प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. किंवा प्रकल्पातून तयार होणारा माल प्रवर्तकाच्या चालू व्यवसायात वापरला जाऊ शकतो. अशा वेळीही प्रकल्प साहज यशस्वी होतो. 

उदाहरणार्थ, द्राक्ष पिकवणारा शेतकरी मनुका बनवण्याचा किंवा द्राक्षापासून वाईन बनवण्याचा प्रकल्प सुरु करत असेल अथवा मनुका निर्यात करणारा व्यापारी मनुका बनवण्याचा प्रकल्प उभा करत असेल तर तो प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. तसेच जर एखादा प्रवर्तक दुधाची डेअरी चालवत असेल तर पनीर किंवा इतर दुधापासून बनणारे पदार्थ तयार करून विकण्याचा प्रकल्प त्याने स्थापणे योग्य ठरते. प्रवर्तकाच्या सध्याच्या व्यवसायाचा प्रकल्पाला कच्चा माल खरेदी करण्यात किंवा बाजारपेठ मिळवण्यात फायदा होतो. 

तसेच प्रवर्तकाची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे यावरून व्यवसायाची यशस्विता पडताळता येते. उत्पादनास लागणाऱ्या तंत्रज्ञानात पारंगत असल्यास व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होते. अथवा एखाद्या व्यवसायात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असेल व प्रवर्तक चार्टर्ड अकाउंटंट किंवा आर्थिक व्यवहारात पारंगत असल्यास त्याचा व्यवसायाला फायदा होईल. 

अहवालाची मांडणी 

अहवालाच्या पहिल्या भागात अहवाल तयार करत असताना वापरलेली कार्यपद्धती, गृहीतके नमूद करणे आवश्यक आहे. तसेच वाचकाला विषयाचा अंदाज येण्यासाठी विभागांची अनुक्रमणिका मांडणे आवश्यक आहे. अहवालाचे विभाग सामान्यतः खालील प्रमाणे असतात:

१. प्रास्ताविक (Project Concept)

२. बाजारपेठ (Market)

३. प्रक्रिया, तंत्रज्ञान व उत्पादन यंत्रसामग्री (Process, Plant & Machinery)

४. प्रकल्प उभारणीचे वेळापत्रक (Schedule of Implementation)

५. मनुष्यबळ व उत्पादन खर्च (Manpower & Cost of Manufacturing)

६. प्रकल्प उभारणीचा खर्च (Project Cost)

७. वार्षिक उत्पन्न व व्यवहार्यता विवेचन (Revenue & Commercial viability)