मनोगत
कोणताही व्यवसाय सुरु करण्याअगोदर व्यवसायाची व्यवहार्यता समजावून घेणे आवश्यक असते. व्यवसायात जे उत्पादन करायचे आहे त्यास किती व कोठे बाजारपेठ आहे हे समजावून घेणे आवश्यक असते. तसेच भविष्यात या उत्पादनास किती मागणी असेल याचा अंदाज घेणे आवश्यक असते. प्रकल्पास लागणारे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री इत्यादींचा सखोल अभयास करून आपल्या प्रकल्पास योग्य असे तंत्रज्ञान व यंत्र सामुग्री निवडणे आवश्यक असते. प्रकल्प उभारणीचा सविस्तर आराखडा तयार करून लागणाऱ्या कालावधीचा अंदाज तयार करावा लागतो. प्रकल्पास लागणाऱ्या भांडवलाची सविस्तर मोजदाद करून एकूण भांडवलाची आवश्यकता ठरवावी लागते. उत्पादनास लागणारे मनुष्यबळ, कच्चा माल व इतर निविष्ठा यांची आवश्यकता व त्यावर होणारा खर्च याचा अंदाज तयार करावा लागतो. बाजारात उत्पादनास मिळणारी अपेक्षित किंमत ठरवून प्रकल्पात मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज घ्यावा लागतो. मिळणारे उत्पन्न, उत्पादनास लागणारा खर्च, भांडवलावरील व्याज, घसारा, इत्यादींची मोजदाद करून निव्वळ नफ्याचा अंदाज घ्यावा लागतो. यावरून प्रकल्पास होणारा खर्च आणि मिळणारा नफा यांचा विचार करून प्रकल्पाची व्यवहार्यता ठरवावी लागते.
वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींचे विवेचन प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालात केले जाते. व्यवहार्यता अहवालाच्या निष्कर्षावरून व्यवहारात उतरावे अथवा नाही याचा निर्णय प्रवर्तक घेतो. हा निर्णय अतिशय महत्वाचा असल्याने योग्य व्यवहार्यता अहवाल तयार करणे अतिशय महत्वाचे आहे. व्यवहार्यता अहवाल केवळ प्रवर्तकाला निर्णय घेण्यासाठी उपयोगी असतो असे नाही परंतु व्यवसायात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार, कर्ज देणारी बँक, सरकारी परवाने देणारे वेगवेगळे सरकारी विभाग याना देखील व्यवहार्यता अहवाल प्रस्तुत करणे आवश्यक असते. यासाठी प्रवर्तकाला व्यवहार्यता अहवाल कसा तयार करावा व त्याचे महत्व काय आहे हे माहित असणे अतिशय आवश्यक आहे.
मी गेली तीस वर्षे व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या व्यवसायात आहे. या तीस वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या व्यवसायांचा व्यवहार्यता अहवाल करण्याचा योग आला. या सर्व अनुभवाचा फायदा मराठी तरुणांना व्हावा या साठी प्रशिक्षणपर लेखन करावे ही इच्छा निर्माण झाली आणि त्यातूनच ह्या पुस्तकाची निर्मिती झाली. जास्तीतजास्त मराठी तरुणांना व्यवसाय सुरु करता यावा हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. या पुस्तकाद्वारे होतकरू तरुण उद्योजकाला आपल्या व्यवसायाचा व्यवहार्यता अहवाल बनवता यावा किंवा जर व्यावसायिक तज्ज्ञाकडून अहवाल करून घेतल्यास त्याचा अभ्यास सहज व्हावा ही अपेक्षा आहे.
पुस्तक लिहिण्यात व प्रकाशित करण्यात माझे कुटुंबीय, सहकारी, मित्र, प्रकाशक, यांनी दिलेल्या प्रोत्साहन आणि मदतीशिवाय या पुस्तकाचे प्रकाशन शक्य नव्हते. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.
गिरीश घाटे