६. प्रकल्प उभारणीचा खर्च
प्रकल्पाच्या उभारणीस लागणारा तपशीलवार खर्च या भागात दिला जातो. प्रकल्पाला लागणारी जमीन व तिचा विकास (land & Site Development), प्रकल्पास लागणारी यंत्रसामग्री व इतर सुविधा (Plant & Machinery), प्रकल्पास लागणारे तंत्रज्ञान व अभियांत्रिकी (Technology & Engineering), प्रकल्पपूर्व खर्च (Pre-operative Expenses), उभारणीदरम्यान जमा व्याज (Interest During Construction), आकस्मिक खर्च (Contingency) व खेळत्या भांडवलाची प्रवर्तकाने करावयाची तरतूद (Margin Money towards Working Capital) इत्यादी खर्च प्रकल्प उभारणीच्या खर्चात मोडतो. या सर्व खर्चाची तपशीलवार माहिती पुढील भागात समजावून घेऊ.
जमीन व जमिनीचा विकास (Land & Site Development)
प्रकल्पास लागणाऱ्या इमारती व इतर सुविधा यांना सामावून घेण्यास पुरेशी अशी जमीन खरेदी करणे आवश्यक असते. प्रकल्पाच्या पुढील वाढीचा विचार करून वाढीव जमीन खरेदी करणे रास्त ठरते. प्रकल्पाच्या उभारणीआधी जमिनीचा विकास करणे आवश्यक असते. जमिनीचे समतलीकारण (leveling), कंपाउंड भिंत (Compound Wall), अंतर्गत रस्ते (Internal Roads), पाण्याचा निचरा (Storm Water Drains) या गोष्टी जमिनीच्या विकासात मोडतात. प्रकल्प उभारणीच्या खर्चात जमीन व जमीन विकासासाठी पुरेसा निधी राखला जातो.
इमारत व इतर बांधकाम (Civil & Structural)
प्रकल्पास लागणाऱ्या सर्व इमारती तसेच इतर बांधकाम याच्या खर्चाचा सविस्तर अंदाज तयार केला जातो. यात प्रमुख उत्पादन यंत्रसामग्रीस लागणाऱ्या इमारती, साठवणूक व इतर हाताळणीस लागणाऱ्या इमारती, इतर सुविधा व बांधकाम यांचा या खर्चात समावेश होतो. इमारतीचा प्रकार व उंची यावरून इमारतीच्या खर्चाचा दर ठरतो. वेगवेगळ्या इमारतींच्या खर्चाचा दर आणि क्षेत्रफळ यावरून लागणाऱ्या खर्चाचा अंदाज ठरावला जातो. प्रकल्पास लागणाऱ्या सर्व इमारती व इतर बांधकामाची याप्रकारे केलेली तरतूद प्रकल्पाच्या उभारणीत जोडली जाते.
यंत्रसामग्री (Plant & Machinery)
उत्पादनास लागणारी प्रमुख यंत्रसामग्री व इतर सुविधांवर होणारा खर्च या भागात मांडला जातो. खर्चाचा वर्गवार तपशील दिला जातो. खर्चाची विभागणी सर्व प्रथम प्रमुख यंत्रसामग्री (Plant & Machinery) आणि इतर सुविधा (Utilities & Misc Fixed Assets) यात केली जाते. प्रमुख यंत्रसामग्रीपैकी काही भाग आयात केलेला असल्यास त्याचा खर्च वेगळा मांडला जातो.
खर्चाची वर्गवारी मूळ किंमत, वाहतूक खर्च, विमा, उत्पादन शुल्क इत्यादी नुसार मांडली जाते. खर्चाची मांडणी खलील प्रमाणे केली जाते:
आयाती यंत्रसामग्री
स्थानिक यंत्रसामग्री
यंत्रसामग्रीची मूळ किंमत
यंत्रसामग्रीची मूळ किंमत
समुद्री मालवाहतूक व विमा
उत्पादन शुल्क
सीमा शुल्क
वाहतूक व विमा
उत्पादन शुल्क
पायाभरणी ( सर्व यंत्रसामग्री )
आयात मंजुरी व माल वाहतूक
स्थापना ( सर्व यंत्रसामग्री )
तंत्रज्ञान व प्रकल्प अभियांत्रिकी (Technology & Engineering)
प्रकल्पाला लागणारे तंत्रज्ञान, इमारत बांधणी व इतर सामग्री साठी लागणारे अभियांत्रिकी ज्ञान (Engineering) यासाठी प्रकल्पात खर्चाची तरतूद करणे आवश्यक असते. तसेच प्रकल्पाची उभारणी करताना तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीची (Technical Supervision) गरज असल्यास त्याप्रमाणे खर्चाची तरतूद येथे आवश्यक आहे.
प्रकल्पपूर्व खर्च (Preoperative Expenses)
प्रकल्प उभारणीच्या दरम्यान होणारा व्यवस्थापकीय खर्च प्रकल्पपूर्व खर्च (Pre - Operative Expenses) या नावाने ओळखला जातो. प्रकल्प उभारणी दरम्यान लागणारा कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे, प्रवास खर्च, यंत्रसामग्री उभारतानाचा विमा खर्च, उत्पादन चाचणी दरम्यान होणारा खर्च, इत्यादी खर्च प्रकल्पपूर्व खर्चात मोडतो. यासर्व खर्चाची तरतूद प्रकल्प उभारणी खर्चात जोडली जाते.
उभारणी दरम्यान जमा व्याज (Interest During Construction)
प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले जाते. मंजूर झालेले कर्ज प्रकल्प खर्च विनिमयाच्या प्रमाणात दिले जाते. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पात कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसल्याने प्रकल्प पूर्ण होईपर्यंत बँक कर्जाची परतफेड किंवा व्याज भरण्याची अपेक्षा करत नाही. परंतु या कालखंडात जमा होणाऱ्या व्याजाची (Interest During Construction, IDC) तरतूद प्रकल्पाच्या खर्चात करणे आवश्यक आहे. प्रकल्पाचे उत्पादन सुरु झाल्यांनंतर ह्या व्याजाची परतफेड अपेक्षित असते.
आगंतुक खर्च (Contingency)
प्रकल्पात सर्व खर्चाची तरतूद केल्यानंतर काही निधी आगंतुक खर्चासाठी (Contingency) ठेवला जातो. प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान येणारा आकस्मिक खर्च यातून करणे अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे प्रकल्पाच्या खर्चाच्या ५% ते १०% खर्च आगंतुक खर्चास राखीव ठेवण्याचा प्रघात आहे.
खेळते भांडवल (Working Capital)
प्रकल्प सुरु झाल्यानंतर उत्पादन खर्चासाठी खेळत्या भांडवलाची ( Working Capital) गरज असते. माल विकून त्याचा मोबदला येईपर्यंत कच्चा माल खरेदी व साठवणूक, कर्मचाऱ्यांचा पगार, वीज बिल, इत्यादीसाठी खर्च करणे आवश्यक असते. या साठी लागणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल म्हणतात. सर्वसाधारण प्रघाताप्रमाणे खेळत्या भांडवलाच्या ७५% भाग बँकेकडून कर्जाच्या रूपात मिळतो. परंतु बाकी २५% खेळत्या भांडवलाची तरतूद प्रवर्तकाला करावी लागते (Margin towards Working Capital). ही तरतूद प्रकल्पाच्या उभारणी खर्चात जोडली जाते.