४. प्रकल्प उभारणीचे वेळापत्रक
प्रकल्प उभारणीचा आराखडा तयार करून त्याचे वेळापत्रक बनवले जाते. प्रकल्प उभारणीचे काम सुरु झाल्यानंतर किती दिवसांनी विकाऊ माल बाजारात येऊ शकेल याचा अंदाज या वेळापत्रकातून दिसतो. वेळापत्रक सहसा दोन भागात मांडले जाते. १. प्रकल्प पूर्व टप्पा (Pre-zero date activities) आणि २. प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचा टप्पा (Activities during implementation). प्रकल्प पूर्व टप्पा पूर्ण केल्याशिवाय सहसा प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीस सुरुवात केली जात नाही.
प्रकल्पपूर्व टप्पा (Pre-Implementation Stage)
प्रकल्प पूर्व टप्प्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो : १. व्यवहार्यता अहवाल तयार करणे, २. भाग भांडवलाची उभारणी व कर्जाची मंजुरी, ३. सरकारी व इतर आवश्यक परवाने, ४. तंत्रज्ञान व त्यासाठी जरूर असल्यास सल्लागाराची नेमणूक, ५. जमिनीची निवड व खरेदी.
सर्वप्रथम व्यवहार्यता अहवाल तयार करणे आवश्यक असते. प्रकल्प तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य आहे अथवा नाही याचा पडताळा या अहवालात घेतला जातो. व्यवहार्यता अहवाल तयार झाल्यानंतर प्रकल्पासाठी भाग भांडवल उभे करणे व बँकेकडून कर्ज मंजुरी मिळवणे या महत्वाच्या बाबी पूर्ण कराव्या लागतात. प्रकल्पाला अनेक परवाने व सरकारी मंजुरी घेणे आवश्यक असते. प्रकल्पपूर्व भागात हे प्रथम पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर प्रकल्पासाठी तंत्रज्ञान कोणते वापरावे यावर निर्णय घ्यावा लागतो. जरूर असल्यास तांत्रिक सल्लागार नेमावा लागतो. प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सर्वप्रथम लागणारी जमीन निवडून खरेदी करणे योग्य ठरते.
उभारणीतील प्रत्यक्ष टप्पा (Implementation Stage)
प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीत समाविष्ठ असणाऱ्या बाबी पुढील प्रमाणे असतात : १. प्रकल्पाची सविस्तर रचना (Planning), २. प्रकल्पास लागणाऱ्या यंत्रसामग्रीची निवड व खरेदी पत्र (Selection of vendors), ३. डिजाईन व पक्के बांधकाम (engineering & construction), ४. यंत्रसामग्रीची स्थापना (Installation of equipment), ५. यंत्रसामग्रीची जोडणी आणि प्राथमिक चाचणी (Interlinking & Commissioning), ६. उत्पादनाची सुरुवात (Commencement of Commercial Production).
सर्वप्रथम प्रकल्पाची सविस्तर रचना, डिजाईन व इंजिनीरिंग तयार करणे आवश्यक आहे. प्रकल्पाला लागणाऱ्या सर्व बाबींचा सविस्तर आराखडा तयार केला जातो. व्यवहार्यता अहवाल याची सुरुवात होय. दुसऱ्या टप्प्यात प्रमुख व इतर लागणारी यंत्रसामग्री देणाऱ्या पुरवठादारांची निवड करून त्यांना खरेदीपत्र दिले जाते. यंत्रसामग्री तयार होण्यास व त्याचा पुरवठा होण्यास वेळ लागत असल्याने खरेदीपत्र अगोदरच दिले जाते. यंत्रसामग्री प्रकल्पाच्या जागेवर येईपर्यंत प्रकल्पाला लागणाऱ्या पक्क्या बांधकामाची पूर्तता केली जाते. यंत्रसामग्री जागेवर पोहोचल्यावर तंत्रज्ञानात नमूद केल्याप्रमाणे त्यांची योग्य स्थापना केली जाते. यंत्रसामग्रीची स्थापना झाल्यावर वीज, पाणी इत्यादींची जोडणी करून यंत्राची प्राथमिक चाचणी घेतली जाते. यानंतर प्रकल्प व्यावसायिक उत्पदनास तयार होतो.