५. मनुष्यबळ व उत्पादन खर्च 


प्रकल्पाला लागणारे मनुष्यबळ तसेच उत्पादनास लागणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्च या बाबत सविस्तर तपशील या भागात दिला जातो. 

मनुष्यबळ (Manpower)

प्रकल्प यशस्वी करण्यात प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. प्रकल्पातील वरिष्ट कर्मचारी व कामगार यांचा तपशीलवार अंदाज या भागात केला जातो. प्रकल्पाचे व्यवस्थापन प्रमुख, त्यांना सहाय्य करणारे विभाग प्रमुख, वेगवेगळ्या विभागात लागणारे तंत्रज्ञ व मदतनीस इत्यादींची वर्गवार माहिती नमूद केली जाते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पदानुक्रमाने रचना व त्यांचे कार्य मांडले जाते. प्रकल्पास लागणारे कुशल व अकुशल कामगार यांची आवश्यकता तयार केली जाते. 

मनुष्यबळावर होणाऱ्या वार्षिक खर्चाचा अंदाज तयार केला जातो. यासाठी पदानुसार दिले जाणारे मूळ वेतन व इतर भत्ता यावरून मनुष्यबळावरील मासिक तसेच वार्षिक खर्चाचा अंदाज तयार केला जातो. कर्मचारी व कामगारांना दिल्या जाणाऱ्या वार्षिक सुट्या, नोकरीचे नियम याबाबत सविस्तर खुलासा केला जातो. 

उत्पादन खर्च (Production Cost)

उत्पादनास लागणारा खर्च प्रामुख्याने दोन भागात मांडला जातो. हे दोन भाग म्हणजे प्रत्यक्ष खर्च व अप्रत्यक्ष खर्च. प्रत्यक्ष खर्चात कच्चा माल व उत्पादनास लागणारा इतर निविष्ठा खर्च मांडला जातो. उत्पादन खर्च समजण्यासाठी साखरेच्या पाकापासून लिमलेटच्या गोळ्या बनवण्याचा लघु उद्योग याचा आधार घेऊ. 

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्च (Direct & Indirect Cost)

उत्पादनास लागणाऱ्या प्रत्यक्ष खर्चात (Direct Expenses) कच्चा माल व निविष्ठा खरेदीस लागणारा खर्च गणला जातो. उदाहरणार्थ लिमलेटच्या गोळ्या बनवण्यात साखर, ग्लुकोज सिरप, रंग व चवीसाठी घालण्याचे अतिरिक्त पदार्थ, पाणी यांचा खर्च प्रत्यक्ष खर्चात जमा होतो. यावरून वार्षीक खर्चाचा अंदाज मांडला जातो. 

उत्पादनास लागणाऱ्या अप्रत्यक्ष खर्चात (Indirect Expenses) पॅकिंग, वीज, पाणी, इंधन, मनुष्यबळ, दुरुस्ती, व्यवस्थापकीय खर्च इत्यादी खर्चाचा समावेश होतो. पॅकिंगचा खर्च काही प्रमाणात उत्पादनाच्या प्रमाणात होत असला तरी इतर अप्रत्यक्ष खर्च बऱ्याच अंशी स्थिर असतात. उत्पादन कमी किंवा जास्त झाले तरी त्या प्रमाणात हे खर्च कमी व जास्त होत नाहीत. 

विपणन व वितरण (Marketing & Distribution)

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाशिवाय विपणन (Marketing) व वितरण (Distribution) यावर बराच खर्च होतो व त्याची तरतूद करणे आवश्यक आहे. यामध्ये पुढील खर्च समाविष्ठ होतो: विपणन, गाडी भाडे, घाऊक व किरकोळ व्याप्याऱ्यांचा नफा व उत्पादन कर (GST). 

ग्राहकाला कंपनीची विश्वासारह्यता पटववून देणे आवश्यक असते. तसेच ग्राहकाला उत्पादनाकडे आकर्षित करून त्यास खरेदीस उद्युक्त करणे आवश्यक असते. विपणन प्रक्रियेचा हा महत्वाचा भाग ठरतो. यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद उत्पादन खर्चात करणे आवश्यक असते. उत्पादनाच्या प्रकाराप्रमाणे हा खर्च ठरतो. याचबरोबर माल ग्राहकापर्यंत पोहोचवणे म्हणजे मालाचे वितरण आवश्यक आहे. गाडी भाडे तसेच मालाचा साठा करणे आवश्यक असते. यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद आवश्यक आहे. 

माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांचा महत्वाचा वाटा असतो. मालाची घाऊक खरेदी व साठा करण्याचे काम घाऊक व्यापारी करतो तर माल प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवायचे काम किरकोळ व्यापारी करतो. या कामाचा मोबदला अर्थातच या व्यापाऱ्यांना मिळणे आवश्यक असते. मालाची अधिकतम किरकोळ किंमत (MRP) ठरवताना वरील खर्च जमेत धरले जातात. तसेच मालावरील उत्पादन कर (GST) देखील त्यामध्ये जोडले जाते.