२. बाजारपेठ 


प्रकल्पातून तयार होणाऱ्या उत्पादनाला मिळणाऱ्या बाजारपेठेचे विवेचन व्यवहार्यता अहवालात करणे महत्वाचे आहे. प्रवर्तकाने प्रत्यक्ष भेटी घेऊन मिळवलेली माहिती तसेच अनेक माध्यमातून प्रसिद्ध झालेली माहिती या आधारे बाजारपेठेचा आवाका या भागात मांडला जातो. स्थानिक बाजारपेठ, आधुनिक बाजारपेठ तसेच उत्पादनाची निर्यात याचा अभयास करून उत्पदनाला मिळणारी  मागणी निर्धारित केली जाते. तसेच सध्या बाजारात असलेल्या पुरवठयाचा अभ्यास केला जातो.  मागणी व पुरवठा यातील तफावत मापून नव्या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला बाजारपेठेत किती वाव आहे याचा पडताळा घेतला जातो. बाजारपेठेबाबत मिळालेल्या माहितीवरून प्रकल्पात तयार करण्याच्या उत्पादनाची प्रत व माप ठरवण्यात येते. 

मागणी (Demand)

बाजारपेठेची सविस्तर माहिती कळण्यासाठी स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. प्रकल्पात होणारे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसाठीच बनवावयाचे असेल तर स्थानिक मागणीचे सविस्तर विवेचन करावे. परंतु तरीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिचय आवश्यक आहे. यामुळे उत्पादनाला भविष्यात काय मागणी येऊ शकेल याचा अंदाज करणे सोपे जाते. मागणी गेल्या तीन वर्षात किती होती व आज बाजारात काय मागणी आहे याचा तक्ता बनवावा. गेल्या तीन वर्षात मागणीत झालेली वाढ, भवीष्यातील मागणीतील वाढीचा अंदाज यावरून पुढील तीन वर्षाचा मागणीचा अंदाज तयार करावा. भविष्यातील मागणीतील वाढीचा अंदाज सरकारी प्रकाशित माहितीवरून घ्यावा. 

मागणीचा अंदाज करताना उत्पादनाच्या मागणीवर परिणाम करणारे प्रमुख घटक पुढील प्रमाणे आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे: (१) मालाची मागणी मालाच्या किमतीशी व्यस्त प्रमाणात निगडित आहे. मालाची किंमत कमी झाल्यास मालाची मागणी वाढते. तसेच मालाची किंमत वाढल्यास मालाची मागणी कमी होते. (२) ग्राहकाच्या मिळकतीत वाढ झाल्यास मालाच्या मागणीत वाढ होते. (३) मालाच्या संबंधित वस्तूची किंमत वाढल्यास मालाची मागणी कमी होते. उदाहरणार्थ इंधनाचे भाव वाढल्यास वाहनांची मागणी कमी होते. (४) ग्राहकाच्या आवडीत होणाऱ्या बदलातून मालाची मागणी कमी किंवा जास्त होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या मालाला पर्यायी वस्तू बाजारात आली व ती ग्राहकाच्या पसंतीस जास्त उतरली तर आपल्या मालाची बाजारातील मागणी कमी होते. (५) मालाबाबत ग्राहकाच्या अपेक्षा उंचावल्या तर मालाची मागणी व त्याचबरोबर मालाची किंमत वाढते. उदाहरणार्थ शहराच्या एखाद्या भागात सरकारी विकासाची कामे जाहीर झाली तर त्या भागातील जमिनीला मागणी अचानक वाढते. (६) बाजारात मागणीदारांची संख्या वाढल्यास मालाला मागणी वाढते. उदाहरणार्थ मालाला निर्यात बाजारपेठ उपलब्ध झाल्यास मागणीदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. 

पुरवठा (Supply)

मागणी प्रमाणेच मालाच्या बाजारातील पुरवठ्याचा अभ्यास करणे आवश्यक असते. प्रकल्पाचा माल स्थानिक बाजारपेठेत विकाऊ असला तरी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पुरवठ्याची माहिती आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर मालाचा पुरवठा काय आहे याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. पुरवठा करणारे कोणत्या प्रतीचा माल बनवतात व कोणते तंत्रज्ञान वापरतात याची माहिती समजावून घेणे आवश्यक आहे. प्रकल्पातून तयार होणारा माल या प्रतीहून चांगला व प्रगत तंत्रज्ञानातून बनवला जाईल याची खात्री करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. 

पुरवठ्याचा अंदाज बांधताना पुढील परिस्थीचा अभ्यास करणे आवश्यक आहे: (१) मालाच्या उत्पादनास लागणाऱ्या कच्या मालाच्या किमतीत झालेल्या फरकाने पुरवठा वाढतो. कच्या मालाची किंमत कमी झाल्यास उत्पादन खर्च कमी होतो व त्यामुळे उत्पादक मालाचा पुरवठा वाढवण्यास उदुक्त होतो. (२) पुरवठादारांची उत्पादन क्षमता वाढल्यास उत्पादनात वाढ होते व बाजारपेठेतील पुरवठा वाढतो. (३) मालाच्या उत्पादनात नवे तंत्रज्ञान आल्यास मालाची उत्पादन क्षमता वाढते तसेच मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. त्याचबरोबर मालाचा बाजारपेठेतील पुरवठा वाढतो. (४) उत्पादकाला एखाद्या दुसऱ्या वस्तूचे उत्पादन करण्याची संधी असल्यास व त्या वस्तूच्या विक्रीत जास्त फायदा असल्यास आपल्या वस्तूचे तो उत्पादन कमी करतो. उदाहरणार्थ मनुका बनवण्यात शेतकऱ्याला जास्त फायदा असल्यास तो आपली द्राक्षे मनुका बनवण्यासाठी वापरतो. यामुळे बाजारात खाण्यासाठी द्राक्ष कमी येतात. (५) शासकीय धोरणांचा पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. मालाच्या पुरवठ्यास पोषक शासकीय धोरण झाल्यास मालाच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ होऊ शकते. 

मागणी - पुरवठा तफावत (Demand Supply Gap)

मागणीचा पुढच्या तीन वर्षाचा अंदाज व सद्य पुरवठा यावरून मागणी आणि पुरवठा यामध्ये निर्माण होणारी वाढती तफावत याचा तक्ता करावा. यावरून नवीन येणाऱ्या बाजारातील पुरवठादारांना बाजारपेठेची किती व्याप्ती उपलब्ध आहे याचा अंदाज मिळतो. 

बाजारपेठेचे विश्लेषण व प्रकल्पाबाबतचे निर्णय 

मागणी - पुरवठा तफावत या बाबत केलेल्या विवेचनावरून प्रकल्पात तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनाची प्रत व माप ठरवण्यात येते. माल पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी व त्यापुढे कसे वाढवत जावे याचा आराखडा केला जातो. याचा उपयोग प्रकल्पाच्या यंत्रसामग्रीची अधीकतम उत्पादकता ठरवली जाते.

बाजारपेठेतील मालाच्या मागणीचा अभ्यास करून सद्य उत्पादनाची प्रत कोणती असावी यावर प्रथम निर्णय घेतला जातो. त्याचबरोबर बाजारात विकला जाणाऱ्या मालाची गुणवत्ता काय आहे याचा अभ्यास करून त्या प्रकारची किंवा त्याहून चांगली गुणवत्ता असलेला माल उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी ही माहिती उपयोगी ठरते. मालाची प्रत व गुणवत्ता ठरवल्यानंतर मालाची उत्पादकता यावर निर्णय घेतला जातो. बाजारात किती माल विकता येईल याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणे मालाची उत्पादकता ठरवली जाते. मालाची बाजारात मिळणारी किंमत व आपल्या व्यवसायात निर्माण होणाऱ्या मालाच्या उत्पादनाची किंमत यांची तुलना करून आपला माल बाजारात विकणे शक्य आहे का याचा पडताळा केला जातो. 

प्रकल्प यशस्वी होण्यात प्रकल्पाची योग्य जागा निवडणे ही अत्यंत महत्वाची बाब ठरते. प्रकल्पाची जागा ठरवताना काही महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ बाजारपेठेच्या जवळ असणे, कच्या मालाची सहज उपलब्धता, खरेदी किंमत, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, वीज व इतर निविष्ठांची उपलब्धता, सरकारी सवलती, इत्यादी. या सर्व बाबींचे प्रकल्प यशस्वी होण्यात कसे महत्व आहे हे व्यवहार्यता अहवालात नमूद करणे गरजेचे आहे.